पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी यथे 31 मे 1725 रोजी झाला.माणकोजी शिंदे आणि सुशीला देवी हे त्यांचे माता पिता होते.त्यांचा विवाह इंदोरच्या खंडेराव होळकर यांच्याबरोबर झाला.त्यांना मालेराव आणि मुक्ताबाई हि दोन अपत्ये होती.मल्हारराव होळकर हे त्यांचे सासरे होते.पती खंडेराव होळकर फारसे कर्तबगार नसल्यामुळे मल्हाररावानीअहिल्यादेविना राज्यकारभार,युद्धातील डावपेच यांचे शिक्षण दिले.पती खंडेराव होळकर यांच्या अकाली निधनानंतर मल्हारराव होळकरांनी तत्कालीन रूढी परपरेनुसार अहिल्यादेविना सती जावू दिले नाही.मल्हारराव होळकर खंबीरपणे अहिल्या देवींच्या पाठीशी उभे राहिले.
Choundi-Location Link –
https://maps.app.goo.gl/iUqJyH8k5Yz4wXS36
अहिल्यादेवी होळकर यांची प्रशासन व्यवस्था व न्याय व्यवस्था Ahilya Devi Holkar’s administration system and justice system
अहिल्यादेवी होळकर यांना लोकानी लोकमाता,पुण्यश्लोक,देवी,गंगाजळ,निर्मळ या सगळ्या पदव्या अर्पण केल्या होत्या.त्यांनी अत्यंत प्रेमाने सामान्य माणसाचे हित बघितले.प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगता यावे ;इकडे लक्ष दिले. एक राज्यशासक म्हणून त्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. खंबीर स्वभाव ,स्वाभिमान आणि चातुर्य याच्यामुळे त्यांनी अनेक संकटावर मात केली.त्यांनी केलेल्या अचूक न्यायदानाचे अनेक दाखले इतिहासामध्ये नोंद झालेले आहेत. सर्वसामान्य लोकांना दाद मागता यावी यासाठी राजप्रसादासमोर मोठी घंटा उभारण्यात आली होती. सर्वप्रथम न्याय मंत्री फिर्यादीचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना न्यायदान करीत असत परंतु फिर्यादीला न्याय पसंत नसेल तर स्वतः अहिल्यादेवी न्यायनिवाडा करीत असत.
अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य Public welfare work of Ahilya Devi Holkar
देशावर निष्ठा,बाणेदार वृत्ती,साधी राहणी आणि उच्च चारित्र्य हे अहिल्यादेवींचे विशेष गुण होते.त्या धार्मिक होत्या परंतु धर्मांध नव्हत्या.त्यांनी भारतात अनेक ठिकाणी घाट,मंदिरे,धर्मशाळा,अन्नछत्र,पाणपोया,विहिरी रस्ते बांधून आदर्श सामाजिक कार्य केले आहे.सर्व धर्मियांसाठी त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला होता. अहिल्यादेवींनी भारतातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काही नवीन मंदिरे बांधली. सर्व पवित्र मानल्या गेलेल्या भारतातील नद्यांवर त्यांनी घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या ,अन्नछत्राची व्यवस्था केली.
अहिल्यादेवी होळकर यांचे महिलांसाठी विशेष कार्य Special work for women by Ahilya Devi Holkar
एक महिला राज्यकर्ता व राज्यशासक या नात्याने त्यांनी आपल्या राज्यातील सर्व महिलांसाठी विशेषतः विधवा महिलांसाठी नवीन कायदे व नियम बनविले. विधवा महिलांना संपत्तीचा अधिकार दिला, सती प्रथा बंद केली. महिलांना किमान शिक्षण मिळावे यासाठी विद्यालयांची व्यवस्था केली. महिलांसाठी नद्यांवर स्वतंत्र घाट बांधले. मल्हारराव होळकर आणि पुत्र मालेराव यांच्या निधनानंतर अहिल्यादेवी स्वतंत्रपणे राज्यकारभार करू लागल्या. त्यावेळी शेजारी असलेल्या राज्यांनी उपद्रव देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना प्रतिकार करण्यासाठी अहिल्यादेवींनी महिला सेना निर्माण केली. समकालीन भारतातच नव्हे तर जगामध्ये अशा प्रकारचे हे एकमेव उदाहरण असावे.
अहिल्यादेवी होळकर यांचे राजकीय योगदान Political contribution of Ahilya Devi Holkar
अहिल्यादेवी होळकर यांना युद्ध रणनीतीची चांगली जाण होती.अनेक युद्धात त्या स्वतः रणांगणात उतरल्या होत्या. मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर अहिल्यादेवी स्वतः संपूर्ण राज्यकारभार पाहू लागल्या. राज्याची राजधानी इंदोरहून महेश्वर येथे स्थलांतरित केली. राज्यामध्ये डाकू व लुटारूंचा उपद्रव वाढलेला होता.त्यावेळी अहिल्यादेविनी एक धाडसी निर्णय जाहीर केला कि,जो कोणी डाकू व लुटारूंचा उपद्रव नाहीसा करेल त्याच्या बरोबर कन्या मुक्ता हिचा विवाह केला जाईल. यशवंतराव नावाच्या एका सामान्य कुटुंबातील तरुणाने त्या डाकूंचा बंदोबस्त केला.त्यावेळी अहिल्यादेवी यांनी आपली कन्या मुक्ताबाई हिचा विवाह यशवंतरावशी लावून दिला.
अहिल्यादेवी होळकर यांचा राजकीय संघर्ष Political Struggle of Ahilya Devi Holkar
पानिपत येथे झालेल्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला.युद्धात पराभूत आणि जखमी झालेल्या सैन्याची अहिल्यादेवी होळकर यांनी माणुसकीच्या नात्याने केलेली सेवा इतिहासामध्ये उपेक्षित राहिली आहे.मल्हारराव होळकरांच्या मृत्यू नंतर पेशव्यांनी इंदोरची सुभेदारी पुत्र मालेराव यांच्याकडे दिली.मालेरावला राज्यकारभार करणे जमले नाही.मालेरावाचेही अकाली निधन झाले.राज्याला वारस नसल्यामुळे अराजकता निर्माण झाली.त्यावेळी अतिशय जागरूकपणे आणि दुरदर्शीपणे विचार करून मल्हाररावांचे दासीपुत्र असलेले तुकोजी होळकर यांना इंदोरची सुभेदारी देण्याची विनंती पेशव्यांकडे केली.अहिल्यादेवी यांच्या विनंतीला मान देवून पेशव्यांनी तुकोजी होळकर यांना सुभेदारीचे वस्त्र पाठवले. तुकोजी होळकर सुभेदार असले तरी संपूर्ण राज्यकारभार अहिल्यादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली चालत होता.
राजधानी महेश्वर Capital Maheshwar
Maheshwar (M.P.) Location Link-
https://maps.app.goo.gl/U1mjSLqYw8p1tsTaA
अहिल्यादेवी होळकर यांनी नर्मदा नदीच्या काठावर महेश्वर याठिकाणी राजधानी स्थापन केली. प्रसिद्ध कवी अनंतफंदी यांनी महेश्वरचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे त्यावरून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची कल्पना येते,”नर्मदा नदीच्या काठावर बांधलेल्या उंच मंदिरामुळे,घाटामुळे महेश्वर तीर्थक्षेत्र कैलासासारखे वाटते.देशोदेशीचे लोक येथे येतात,अहिल्यादेवींचे कार्य बघून कृतार्थ होतात,इथे गडगंज संपत्ती आहे.बाजार दुकाने गजबजलेली आहेत.अहिल्यादेवी आपल्या प्रजेचा प्रतिपाळ पोटच्या मुलाप्रमाणे करतात.प्रजेचे रक्षण आणि त्याच्या सुख सोयीकड त्यांचे बारीक लक्ष आहे.अन्नछत्रातून गोरगरीब भोजन करतात.” पेशव्यांनी सुद्धा महेश्वरचा उल्लेख पुण्याचे पुण्यद्वार असा केला आहे.यातच महेश्वर आणि अहिल्यादेवी होळकर यांचा गौरव आहे.
अहिल्यादेवी होळकर यांचे अजरामर कार्य Immortal work of Ahilya Devi Holkar
अहिल्यादेवी होळकर यांनी नर्मदा नदीला अनेक सुंदर घाट बांधले,संस्कृत पाठशाला सुरु केल्या,विद्वान आणि कलावंताना राजाश्रय दिला.हुंडाबंदी,खेड्या पर्यंत न्याय,कुटीर उद्योग ,दारूबंदी हे सर्व कार्यक्रम अहिल्यादेविनी सर्वप्रथम सुरु केले. अहिल्यादेवी होळकर शिवभक्त होत्या त्यांनी चलनात आणलेल्या नाण्यावर श्री शंकर आणि दुसऱ्या बाजूला बेलपत्र व नंदीची प्रतिमा कोरलेली असे.अहिल्यादेवी आपल्या प्रजेचे पालन आपल्या मुलाप्रमाणे करीत होत्या. त्यामुळे राज्यातील प्रजा त्यांना आपली आई मानत असे. अहिल्यादेवी होळकर नेहमी म्हणत असत कि,स्नानाने देहशुद्धी होते,ध्यानाने मनशुद्धी होते तर दानाने धनशुद्धी होते.आपल्या संस्कृती मध्ये त्याग आणि दानधर्म याला फार महत्त्व आहे.
सारांश Summary
अहिल्यादेवी होळकर यांना लोकानी लोकमाता,पुण्यश्लोक,देवी,गंगाजळ,निर्मळ या सगळ्या पदव्या अर्पण केल्या होत्या.खंबीर स्वभाव ,स्वाभिमान आणि चातुर्य याच्यामुळे त्यांनी अनेक संकटावर मात केली.एक महिला राज्यकर्ता राज्य शासक या नात्याने त्यांनी आपल्या राज्यातील सर्व महिलांसाठी विशेषतः विधवा महिलांसाठी नवीन कायदे व नियम बनविले. पानिपत येथे झालेल्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला.युद्धात पराभूत आणि जखमी झालेल्या सैन्याची अहिल्यादेवी होळकर यांनी माणुसकीच्या नात्याने केलेली सेवा इतिहासामध्ये उपेक्षित राहिली आहे.अहिल्यादेवी होळकर यांनी नर्मदा नदीच्या काठावर महेश्वर याठिकाणी राजधानी स्थापन केली.अहिल्यादेवी होळकर आपल्या प्रजेचे पालन आपल्या मुलाप्रमाणे करीत होत्या. त्यामुळे राज्यातील प्रजा त्यांना आपली आई मानत असे. अहिल्यादेवी होळकर नेहमी म्हणत असत कि,स्नानाने देहशुद्धी होते,ध्यानाने मनशुद्धी होते तर दानाने धनशुद्धी होते.आपल्या संस्कृती मध्ये त्याग आणि दानधर्म याला फार महत्त्व आहे.अहिल्यादेवींचे सर्व जीवन त्याग आणि सेवा यांना समर्पित होते.
No comments:
Post a Comment